fbpx

आमदारकीसाठी काहीही…माढ्याचे संजय शिंदे होणार ‘करमाळा’कर

दीपक पाठक – सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. २०१४ साली झालेल्या करमाळा विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्यात संधी गमावलेले शिंदे यावेळी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्यावेळी दुसऱ्या तालुक्यातील उमेदवार असल्याचा मुद्दा शिंदे यांना चांगलाच डोकेदुखीचा ठरला होता. यावेळी मात्र हा मुद्दा विरोधकांना उचलता येवू नये म्हणून शिंदे यांनी ते करमाळ्यात रहायला येणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे.

विद्यमान आमदार नारायण पाटील आणि त्यांचे चुलतभाऊ माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील यांच्यात अंतर्गत कलह सुरु होता. या कलहाचा फायदा घेत विलास पाटील यांना आपल्या गटामध्ये घेण्यात शिंदे यशस्वी ठरले. नुकताच विलास पाटील यांनी जेऊरमध्ये संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी भाषणादरम्यान विरोधकांवर शेलक्या शब्दात टीका तर केलीच मात्र करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी शिंदे यांनी ते करमाळ्यात रहायला येणार असल्याची जाहीर घोषणा केली.

सद्यस्थिती पाहिली तर गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बऱ्याच गावांना शिंदे यांच्याकडून विकासनिधीचे वाटप केले जात आहे. शिंदे स्वतः विविध कार्यक्रमांना देखील हजेरी लावत आहेत. आगोदर साखर कारखाना सुरु करणे, सूतगिरणी सुरु करणार असल्याची घोषणा करणे, विलास पाटील यांना आपल्या गटात सामील करून घेणे आणि आता करमाळ्यात रहायला येणार असल्याची जाहीर घोषणा करणे हा घटनाक्रम निश्चितच विरोधकांना विचार करायला भाग पडणारा आहे. वरवर जरी हे सोपे राजकारण वाटत असले तरी शिंदे किती धूर्तपणे राजकारण करत आहेत हे हा क्रम पाहिल्यानंतर समोर येतं. शिकारी ज्याप्रमाणे शिकार करण्यासाठी सावजाला वेगवेगळ्या युक्त्या करून पाशांमध्ये अडकवतो अगदी त्याचप्रमाणे शिंदे हे करमाळा विधानसभेच्या जागेची शिकार करण्याकरिता वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. 2009 साली बागलांना आमची मते चालली, मग 2014 ला मी करमाळ्यातून विधानसभेला उभा राहीलो की मी बाहेरचा कसा झालो? असा प्रश्न या वेळी त्यांनी उपस्थित केला होता. माझे गाव (निमगांव) करमाळा मतदारसंघात आहे. माझी जमीन करमाळा तालुक्यात आहे. मग मी बाहेरचा कसा? मी बाहेरचा आहे म्हणणाऱ्या रश्मी बागल सासवडहून करमाळ्यात येऊन विधानसभा निवडणुक लढवण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.

राजकारणात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं असं म्हटल जातं. शिंदे आपल्या भाषणातून जनतेच्या हिताची आणि विकासाची भाषा करतात आणि जनतेची सेवा करण्यासाठी आपण आमदारकी लढवत असल्याचं देखील सांगतात. मात्र जनतेला हे पटवून देण्याच आव्हान शिंदे यांच्यासमोर असणार आहे. करमाळ्यातील जनतेचं मन जिंकायचं असेल तर बाहेरचा नव्हे तर ‘आपला माणूस’ हि प्रतिमा त्यांना निर्माण करावी लागेल, अन्यथा पुन्हा एकदा २०१४ची पुनरावृत्ती होणार हे निश्चित.