fbpx

‘फुगडी’साठी जुळलेले हात विकासाच्या मुद्यावर एकत्र येतील का ?

mla dilip sopal and rajendra raut cover image

बार्शी: राजकारणातील कट्टर विरोधक असणारे आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ‘फुगडी’ सध्या तालुक्याच्या राजकारणात चांगलीच गिरकी घेत आहे. तालुकाच काय पण संपूर्ण जिल्ह्यात फुगडीसाठी जुळलेल्या हातांची चर्चा सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत चवीने चघळली जात आहे. तब्बल २० – २२ वर्षाच्या कट्टर विरोधानंतर नव्याने दिसणारे प्रगल्भतेचे राजकारण दोघांच्या कार्यकर्त्यांना देखील पचनी पडताना दिसत नाही. तर काहींकडून फुगडीसाठी जुळलेले हात विकासाच्या मुद्यावर एकत्र येणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

गेली २५ वर्षे बार्शी तालुक्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असणारे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांनी शुक्रवारी चक्क हातात-हात देत फुगडी खेळली. याला निमित्त ठरले आहे ते भगवंत प्रकटोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीचे, राजकीय आखाड्यात कायम एकमेकांना चीतपट करण्यासाठी तयार असणाऱ्या दोन्ही नेत्यांना फुगडी खेळताना पाहून कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह दिसून आला. तर दोघांचे विरोधक असणारे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी मात्र, हि फुगडी म्हणजे ‘६० -४०’ च्या राजकारणाच प्रतिक असल्याची टीका केली. सोशल मिडीयावर देखील कोणी ‘फुगडी’चे कौतुक केले तर काहींनी ६० -४० हे टायटल देत व्हिडियो व्हायरल केला.

कधीकाळी एकमेकांना संपवायची भाषा करणारे दोन्ही नेते असे एकत्र आल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येणार हे साहजिक आहे. पुणे-मुंबईकडे दिसणारे खेळीमेळीचे राजकारण बार्शी सारख्या राजकीय संवेदनशील तालुक्यात दिसण हे नक्कीच कौतुकाची बाब आहे. पण ‘एक दिवसाची यारी आणि दुसऱ्या दिवशी मारामारी ’ होवू नये हिच अपेक्षा आहे. तालुक्याच्या विकासासाठीही अशा प्रकारचे प्रगल्भ राजकारण होण गरजेच आहे.

दोन्ही नेत्यांच्या राजकारणात काही वर्षांपूर्वी अनेकांनी आपली डोकी फोडून घेतली. तर काहींवर गंभीर गुन्हे देखील दाखल झाले, काळ बदलला तसे राजकारण बदलत गेले, कार्यकर्ते काम-धंद्यात व्यस्त होवू लागले त्यामुळे आपसूकच भांडणे कमी झाली. त्यामुळेच कधीकाळी गुद्यांवर चालणारे राजकारण आज विकासाच्या मुद्यांवर लढावे लागणार आहे. हि गोष्ट दोन्ही नेते चांगलेच जाणून आहेत.

तालुक्याचे राजकारण म्हणजे सोपल आणि राऊत असणारे समीकरण बदलून आज भाजपचे राजेंद्र मिरगणे आणि शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्यामुळे येत्या काळात अटीतटीचा सामना होणार हे निश्चित आहे. शेवटी या सर्वच नेत्यांनी आता चार दिवसाची निवडणूक आणि चार वर्षाचे विकासकारण करणे हीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे फुगडीसाठी जुळलेले हात विकासाच्या मुद्यावर एकत्र येणार का हे पाहण महत्वाच आहे.

1 Comment

Click here to post a comment