ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि कथालेखक वामन होवाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असं त्यांचं कुटुंब आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास वामन होवाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचं निधन झालं.

बेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. दलित साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान असून आंबेडकर चळवळीतही ते सक्रीय होते.अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहेत.

मजल्यांचे घर आणि पाऊसपाणी या कथा इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतही अनुवादित झाल्या आहेत. तर जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत.

वामन होवाळ हे मूळचे सांगलीतील तडसर गावचे होते. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले. शालेय वयातच कथालेखनाची आवड निर्माण झाली. शंकर पाटील यांच्या लेखनातून कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी पुढे कथालेखन सुरु केले.

वामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. होवाळ यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ठाणे आणि नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात घेतले. शालेय जीवनापासून त्यांनी कथालेखन केले. त्यांची पहिली कथा पुण्यातील एका मासिकात छापून आली. यानंतर त्यांच्या विविध मासिकांमधून ३५० हून अधिक कथा प्रसिद्ध झाल्या.