साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घालणारा गजाआड

सातारा : बनावट कागदपत्रे बनवून कोलकात्ता येथे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घालून फरार असलेल्या अट्टल ठगाला पाचगणी पोलिसांनी सापळा रचून मुंबईत गजाआड केले. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, गुजरात येथील रहिवासी असणारा भावेश हरिहर भट (वय 53) हा बिल्डर असून त्याचा व्यवसाय पश्‍चिम बंगाल, मुंबई व इतरत्र सुरू आहे.

तो मुंबई येथे वास्तव्यास असून पाचगणी या पर्यटनस्थळावरही त्याचा मोठा बंगला आहे. कधी कधी तो पाचगणी येथेही राहवयास येत असतो. व्यवसायादरम्यान भावेश भट याने दुर्गापूर, कलकत्ता येथे ब-याच लोकांना बनावट कागदपत्रे बनवून त्यातूनच जमीन हडपून गंडा घातल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे साडे तीन कोटींपेक्षाही जास्त रुपयांचा अपहार भावेश याने केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.त्यामुळे त्याच्याविरोधात बनावट कागदपत्रे बनवणे, फसवणूक, रकमेचा अपहार असे गुन्हे दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

त्यामुळे कोलकात्ता पोलीस त्याच्या मागावर होते. तसेच त्याच्यावर दुर्गापूर सत्र न्यायालयाचे वॉरंट होते. भावेश भट याचा पाचगणी येथे बंगला असल्याने पाचगणी पोलिसांना तपासासाठी सहभागी केले होते. गेल्या काही दिवासांपासून पाचगणी पोलीस त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवून होते. परंतु, भावेश पोलिसांना चकवा देत होता.