पारनेरच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी 6 जणांना अटक

अहमदनगर  : वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणा-या माहिला तहसीलदार भारती सागरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचा-यांनी गुरूवारी सायंकाळी 6 जणांना अटक केली आहे.पोकलेन चालक नरेश बिशु सहाणी (वय 50,राहाणार बिहार), पोकलेनचा मालक रमेश (राहाणार उपडी,जिल्हा कोल्हापूर),जेसीबी चालक अक्षय वाघमारे(22,राहाणार मुखेड,जिल्हा नांदेड),जेसीबी मालक विठ्ठल कुरंदले (राहाणार अण्णापूर,तालुका शिरूर),प्रशांत साबळे (वय 22) व तुषार दौंडकर(वय 23,दोघे राहाणार घोटीमाळ,तालुका शिरूर,जिल्हा पुणे)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचार्यांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळ पासूनच पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती.अखेरीस सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर 6 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कुकडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचलेल्या तहसीलदार भारती सागरे व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांवर वाळू चोरांनी हल्ला चढविला होता.

कारवाई दरम्यान, भारती सागरे यांनी एका पोकलेन मशीनचा ताबा घेऊन स्वत: ते चालवित नेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी वाळू चोरांपैकी एका तरूणाने कारवाईला विरोध करीत पोकलेनमधील डिझेल काढून ते स्वत:च्या अंगावर तसेच तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचार्यांच्या अंगावर फेकले.तसेच खिशातून काडीपेटी काढून आता मी स्वत:ला पेटवून घेतो व तुम्हालाही पेटवून देतो असे म्हणून या तरूणाने काडी पेटविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी गंगाधर फसले यांनी त्याच्या हातातून काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.बुधवारी रात्री उशीराने पारनेर पोलीस ठाण्यात या हल्ल्याच्या संदर्भात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सागरे यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करण्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली. वरिष्ठ स्तरावरून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर पोलीस देखील गुरूवार सकाळ पासूनच कामाला लागले होते.

Comments
Loading...