POKवर हल्ला करण्यासाठी लष्कर सज्जच आहे : लष्करप्रमुख बिपीन रावत

Bipin Rawat

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानच्या तावडीतून पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित कोणत्याही मोहिमेसाठी भारतीय लष्कर तयार आहे, असं विधान लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलं आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याबाबत पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. मंत्र्यांच्या या विधानावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पीओकेबाबत निर्णय घेण्याचे काम सरकारचे आहे. अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले सैन्य नेहमी तयार असते. जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचंही लष्करप्रमुखांनी स्वागत केलं आहे.जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी ३० वर्षे दहशतवादाचा सामना केला आहे.त्यानंतर आता जेव्हा आपल्याकडे शांतता असते तेव्हा तिथली व्यवस्था कशी असते, हे अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली आहे. असं लष्करप्रमुख रावत यांनी म्हणलं आहे.

काश्मीरच्या लोकांना हे कळायला हवे की हे जे काही होत आहे ते त्यांच्या भल्यासाठीच होत आहे. हे कलम हटवल्यानंतर काश्मीर आता संपूर्ण देशाशी जोडला गेला आहे. याचा अनुभव आता इथल्या लोकांनाही येईल. काश्मीरचे लोक हे आपल्याच देशाचे लोक आहेत. ते आमचेच लोक आहेत. काश्मीरच्या लोकांना शांततेचे वातावरण देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना संधी दिली गेली पाहिजे. असंही लष्करप्रमुख रावत यांनी म्हणलं आहे.