fbpx

नाशिकमध्ये लष्कराचं विमान कोसळलं

टीम महाराष्ट्र देशा – नाशिकमध्ये पिंपळगावजवळ लष्कराचे सुखोई विमान कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. पिंपळगावजवळील शिरवाडी येथे ही घटना घडल्याचे वृत्त असून तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज सकाळी ११. १५ वाजता ही घटना घडली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळलं असून या दुर्घटनेत विमानाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे लष्कराचे विमान होते. या विमानात दोन पायलट होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच या दोन्ही पायलटने पॅराशूटच्या आधारे विमानातून उड्या मारल्या. त्यानंतर हे विमान कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जिल्हा प्रशासनाने वेळीच संबंधित विभागांना सूचना दिल्या असून पोलीस तसेच मदत कार्यासाठी १ हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शिवारात विमान कोसळल्याची माहिती मिळताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. .