दानवे यांना सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी- अर्जुन खोतकर

danave vr khotkar

टीम महाराष्ट्र देशा : दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु असून दानवे यांना सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी आहे. असा आरोप शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंवर केला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना दानवे आणि खोतकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

खोतकर म्हणाले “दानवे यांना ‘मातोश्री’वर बोलवलं नाही. खुद्द भाजपच्या नेत्यांचाच दानवेंवर विश्वास नाही. दानवे गुप्तता पाळत नाहीत. ते त्या बैठकीच्या पात्रतेचे नाहीत म्हणून खुद्द पक्षांच्याच नेत्यांचा विश्वास नाही.”

दानवेंचा जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार प्रचंड दहशतीखाली आहेत. दानवे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना ४-४ तास बाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवतात. असा गंभीर आरोप देखील खोतकर यांनी केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फाॅर समर्थन’ अभियानांतर्ग काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, आणि सध्या पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ताणले गेलेले सबंध या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण होती.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास मॅरेथाॅन चर्चा झाली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पुन्हा एकदा मातोश्रीवर जाण्याचं टाळलं अमित शहांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिवसभर अमित शहा यांच्यासोबत होते. मात्र दानवे मातोश्रीवर न गेल्याने तर्क -वितर्कांना उधाण आलं आहे.