आयएसआयला माहिती पुरवल्याप्रकरणी माजी राजनयिक अधिकाऱ्याला तुरुंगवास

नवी दिल्ली – पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एका भारताच्या माजी राजनयिक अधिकाऱ्याला ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माधुरी गुप्ता असं या अधिकाऱ्याच नाव आहे. काल शनिवारी १९ मे दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या, असे उघडकीस आले आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आल्याची माहिती आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिद्धार्थ शर्मा यांच्या खंडपिठाने ६१ वर्षांच्या माधुरी गुप्ता यांना शुक्रवारी दोषी ठरवलं. माधुरीवर विश्वासाला तडा पोहोचवणे, गुन्ह्याचा कट रचणे असे आरोप लावण्यात आले आहेत. माधुरी गुप्ता यांना सरकारी गोपनियता अधिनियम कायद्याच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत दोषी ठरवून त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.