‘१४ वेळेस महापौरपद मिळूनही औरंगाबादला बकाल केले याची खरंच जाणीव नाही का?’

aurangabad

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा लेखाजोखा ‘सुपर संभाजीनगर एक शहर, एक प्रवास’ या कार्यपुस्तिकेबाबत शिवसेना पदाधिकारी विविध पाच वाॅर्डात जाऊन शक्य त्या नागरिकांना माहीती देत आहेत. औरंगाबाद मनपाची निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेनेकडून अशाप्रकारे निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र शिवसेनेच्या कार्य पुस्तिकेवर आणि प्रचाराच्या पद्धतीवर नेटकऱ्यांनी चौदा वेळेस महापौर मिळूनही आपण शहर बकाल केले याची खरंच जाणीव नाही का? असा प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर शिवसेने वर टीका करताना नेटकरी म्हणत आहेत औरंगाबादच्या विकासकामाचं पुस्तक काढलं, तिथपर्यंत ठीक आहे. पुढे सेनेचे नेते, घरोघरी जाऊन विकासकामे सांगा, असे सांगतात. शिवसेनेला एवढा आत्मविश्वास येतो कुठून, हाच प्रश्न आहे. चौदा वेळेस महापौर मिळूनही आपण शहर बकाल केले,याची खरंच जाणीव होत नसेल का यांना.? तसेच शिवसेनेला जाणीव असती तर विकास कामांचा पाढा म्हणायची आणि पुस्तक प्रिंटिंग खर्चातही वाटा शोधायची गरज पडली नसती असेही एकाने म्हटले आहे.

शिवसेनेद्वारे काढण्यात आलेल्या या कार्यपुस्तिकेतुन शहराचा कसा कायापालट झाला, सुनियोजित रचना, नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, अत्यावश्यक सेवा, शिक्षण, आरोग्य, औद्योगीकरण यातुन चौफेर विकास महानगरपालिकेत सातत्याने सत्तेत राहिल्याने शिवसेनेचा या विकासात मोलाचा वाटा असल्याचे दाखवण्यात आले आहे. आमदार अंबादास दानवे यांनी याबाबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, दूरदृष्टीपूर्वक धोरणे, विकासात्मक योजना, चोख अंमलबजावणी आणि उत्तम प्रशासन यातून या शहराचा कायापालट झाला.

आजवर संभाजीनगरने एक शहर ते कॉस्मोपॉलिटीन महानगर असा यशस्वी प्रवास केला आहे. आता हा प्रवास भविष्याचे दीर्घकालीन नियोजन करून पुढच्या आश्वासक टप्प्यापर्यंत पुढे घेऊन जायचे आहे. हा टप्पा म्हणजेच “सुपर संभाजीनगर”! मात्र शहरात खरोखर विकासाची कामे झाली असतील तर पुस्तके काढण्याची काही गरज नाही. असा टोला अंबादास दानवे यांना सोशल मीडियावर नागरिकांकडून लगावला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या