उस्मानाबाद : सेनेच्या खासदार गायकवाडांच्या विरोधात लढण्यासाठी अर्चना पाटील सज्ज

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खा.प्रा.रविंद्र गायकवाड व जि.प. विद्यमान उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील या उभयतांमध्ये आगामी लोकसभा निवडणूकीचा सामना रंगेल अशी जोरदार अटकळ राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

प्रा.रविंद्र गायकवाड  हे या मतदारसंघाचे खासदार असून मागील काही वर्षापासून या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे.शिवसेनेचे प्राबल्य असल्याने शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक असून अनेक शिवसैनिकांना साहजिकच ‘खासदारकी’चे डोहाळे लागले आहेत ! शिवसेननेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत,माजी आमदार ओमराजे निंबाळकर,जिल्हाप्रमुख अनिल खोचरे  आदी इच्छुक  मंडळी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत.खा.गायकवाड हे जिल्हातील एक प्रभावी नेते असून या मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क ही त्यांची मोठी जमेची बाजू असल्यामुळे शिवसेनेकडून त्यांनाच या आगामी लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून बोलले जात आहे.आगामी निवडणूकीत एक-एक जागा पक्षासाठी अत्यंत महत्वाची असल्यामुळे प्रा.गायकवाड यांच्यासारखा हुकमी एक्का पक्षाकडे असताना दुस-या एखाद्या नवख्याला उमेदवारी देवून पक्षश्रेष्ठी कशाला धोका पत्करेल असा एक मतप्रवाह शिवसैनिकांतून ऐकावयास येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रा.गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे .काँग्रेसच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस येथून कोणाला उमेदवारी देणार याबाबत राजकीय वर्तुळात कामालीचे औत्सुक्य लागून राहीले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंञी डाँ.पद्मसिंह पाटील या राजकीय मल्लाला लोकसभेच्या फडात उतरविण्यात येणार असल्याची मागील काही दिवसापूर्वी चर्चा  होती.दरम्यान डाँ.पाटील यांच्या स्नूषा  जि.प. उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांचे नाव अलीकडे जोरदार चर्चेत आले असून मतदारसंघात सध्या त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.शिवसेनेला शह देवून शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ‘अर्चनाताई’ यांच्या रुपाने एका  युवा माहिला नेतृत्वास संधी देण्याची  राजकीय खेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून खेळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहे.
जि.प.उपाध्यक्षा म्हणून त्यांचे काम वाखाणण्याजोगे असून या माध्यमातून त्यांनी आपल्या नेतृत्वाची चूणूक दाखवून दिली आहे.जि.प.उपाध्यक्ष असल्याने अर्चनाताई यांनी ग्रामीण भागात चांगला संपर्क ठेवला आहेत.त्यामुळे लोकसभेच्या सक्षम संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहत आहेत.खा.गायकवाड व अर्चनाताई पाटील यांच्यातच आगामी लोकसभेची लढत होईल अशी शक्यता अलीकडे जोर धरु लागली आहे.गायकवाड व पाटील यांच्यात लढत झाल्यास उस्मानाबाद लोकसभेची ही लढत राज्यातील एक लक्षवेधी लढत ठरल्याशिवाय राहणार नाही,हे माञ निश्चित !
You might also like
Comments
Loading...