शिक्षक होण्यासाठी द्यावी लागणार ऑप्टिटय़ूड टेस्ट

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी होणार मदत

वेबटीम: आता शाळेत भरती होण्याआधी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षक भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी तसेच गुणवत्ताधारक उमेदवार निवडले जावेत यासाठी शिक्षकांना ऑप्टिटय़ूड टेस्ट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभेत विचारण्यात आला. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना विनोद तावडे यांनी याबाबतची माहिती दिली.

कशी होणार शिक्षक भरती प्रक्रिया?
राज्यातील खासगी अनुदानित. अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमधील शिक्षक भरती अभियोग्यता चाचणीमधील गुणांच्या आधारे घेण्यात येणार आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करण्यासाठी तसेच भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली. ही अभियोग्यता चाचणी (ऑप्टिटय़ूड टेस्ट) पुढील भरतीवेळी म्हणजे सहा महिन्यांत घेतली जाणार आहे. यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार असून भरतीसाठी इच्छुक उमेदवार ही ऍप्टीटय़ूड टेस्ट दिल्यानंतर या परीक्षेच्या गुणांसह अर्ज करू शकणार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपल्या वयोमर्यादेत पाच वेळा ही चाचणी देऊ शकणार आहे.