ब्रेकिंग: अखेर पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे, खुद्द शरद पवार उतरणार लोकसभेच्या मैदानात

टीम महाराष्ट्र देशा: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉंग्रेसला अद्याप उमेदवाराचा सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. कॉंग्रेसकडून माजी आ मोहन जोशी, नगरसेवक अरविंद शिंदे तसेच दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड याचं चर्चेत आहे. मात्र आता पुण्याची जागा राष्ट्रवादीला देण्याच्या निर्णय काल रात्री उशिरा घेण्यात आला आहे, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातून लढणार असल्याचं निश्चित झाल आहे.

पुणे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ४ एप्रिलला संपत आहे. मात्र अजूनही कॉंग्रेस उमेदवाराच्या नावावर खलबतं सुरूच आहेत. पक्षामध्ये स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटबाजीमुळे उमेदवारी देयची कोणाला हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडला आहे. यामध्ये शरद पवार यांचे शिष्य मानले जाणारे प्रवीण गायकवाड यांनी कॉंगेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली गेली. मात्र आमच्यातील कोणालाही द्या पण बाहेरून आलेल्या व्यक्तीला नको, अशी भावना पुणे कॉंग्रेसमध्ये उमटताना दिसत आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी सुरेखा पुणेकर या कॉंग्रेस उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसल्याची बातमी काही वृत्त वाहिन्यांनी दिली होती. त्यामुळे पक्षात स्थानिक पातळीवर अस्वस्थता पसरली होती. दरम्यान रावेरची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरु होती.

रविवारी रात्री उशिरा दिल्लीमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाली. पुणे कॉंग्रेसमध्ये सुरु असणारा घोळ पाहता, आता पुण्यातून तुम्हीच लढा, अशी विनंती पवार यांना करण्यात आल्याचं कळतय. त्यामुळे पवार यांनी देखील पुण्यातून लढण्यास होकार दिला आहे.

महत्वाची सूचना – आज जगभरात १ एप्रिल साजरा केला जात आहे, या दिवशी एप्रिल फूल करण्याची प्रथा आहे हे विसरू नये ही नम्र विनंती