पालिकेची विर्सजन तळ्यासाठी ३६ लाख रुपये खर्चास मंजूरी

सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून सातारा शहरात गणेशमूर्ती विसर्जन तळ्याबाबत उलटसुलट चर्चा होती. जिल्हाधिकार्यांनी कृत्रिम तळ्यांनाच मान्यता दिल्यानंतर सोमवारी सातारा नगरपालिकेच्या सभेत स्थायी समितीच्या बैठकीत विसर्जन तळ्यासाठी 36 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व गणेशमूर्तींचे शहरातील विविध पाच ठिकाणच्या तळ्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्यावतीने चार ठिकाणी कृत्रिम तळी तयार करण्यात आली असून पालिकेच्या जलतरण तलावातही विसर्जन करण्यात येणार आहे.

कृत्रिम तळ्यांचे खोदकाम करुन त्यावर प्लास्टिक लायनर टाकून पाणीसाठा करण्यात येणार आहे. विसर्जनादरम्यान येणार्या विविध खर्चासाठी 35 लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यास स्थायी समितीच्या बैठकी मंजूरी देण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के, अल्लाउद्दीन शेख, मुख्याधिकारी शंकर गोरे व नगरसेवक उपस्थित होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेचा अर्थसंकल्पास जिल्हाधिकार्यांनी मंजूरी न दिल्याने पैशांची जुळवाजुळव करण्यास पालिकेस कसरत करावी लागणार आहे.