नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी

नांदेड : शहराला बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली असून, एकूण सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प साकारला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयान्वये समृद्धी महामार्गावरील जालना टी-पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा समृद्धी महामार्गाला थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी १९४ किमी असून, त्यासाठी अंदाजित खर्च ५ हजार ५०० कोटी रूपये असेल. या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी गुरूवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणे शक्य होईल. समृद्धी महामार्ग ते नांदेड शहरापर्यंतच्या रस्त्याचा खर्च अंदाजे ५ हजार ५०० कोटी रूपये आणि नांदेड शहरांतर्गत रस्ते व पुलासाठी लागणारा अंदाजित खर्च १ हजार कोटी रूपये असे एकूण साडेसहा हजार कोटी रूपयांचे हे प्रकल्प आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
· नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडल्यामुळे दळणवळण सुलभ होणार
· नांदेड ते मुंबई व औरंगाबाद प्रवासात वेळ व पैशांची बचत होणार
· मालवाहतूकीचाही लाभ, थेट जेएनपीटीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार
· स्थानिक व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध, विकासाला चालना

महत्वाच्या बातम्या