महामंडळांच्या नियुक्त्या: शिवसेनेकडून निष्ठावंताना डावलत आयरामांना संधी

मुंबई: गेली चार वर्षे रखडलेल्या महामंडळ नियुक्त्यांना मुहूर्त मिळाला आहे, शुक्रवारी राज्य सरकारकडून 10 महामंडळाची नियुक्ती जाहीर करण्यात आली, यामध्ये सत्तेमध्ये नाराज असलेल्या शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचं दिसत आहे. मात्र, शिवसेनेकडून निष्ठावंताना डावलत आयरामांना संधी देण्यात आली आहे.

सत्तेतील जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला 10 महामंडळे देण्यात आली आहेत. यामध्ये कोकणात राष्ट्रवादीमधून आलेलं उदय सामंत यांना महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण, तर पूर्वी मनसैनिक असणारे आणि आता शिवबंधन हाती बांधलेले हाजी राफत शेख यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

आपल्या वक्तृत्वाने सभा गाजवणारे शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांना  कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष देण्यात आले आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजीचा सुरू निर्माण होत आहे.