गंगापूरला कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करा, अन्यथा महसुलमंत्र्यांच्या दालनातच आत्महत्येचा इशारा!

tahsildar

औरंगाबाद : महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध आज मी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला असून मागील पाच महिन्यांपासून रिक्त असलेले गंगापूर तहसीलदार या पदासह तालुक्यातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांचे रिक्त पदे तात्काळ भरून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे न केल्यास दहा दिवसानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालयातील दालनात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांनी प्रशासनाला दिला आहे.

याबाबत माहिती देतांना शिरसाठ यांनी सांगितले की, तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या निलंबनानंतर पाच महिन्यांपासून गंगापूरला कायमस्वरूपी तहसीलदार नाही. नगर परिषदेला मुख्याधिकारी नाही, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता नाही, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख ही कार्यालये कनिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कारभार हाकत आहे. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, लिपिकांच्या जागा रिक्त असल्यामुळे येथे अडाणी कोतवाल लिपिकांचा कारभार सांभाळत आहे. संजय गांधी योजनेचे तीन हजार पाचशे प्रकरणे केवळ तहसीलदार नसल्यामुळे प्रलंबित आहेत.

चालू लाभार्थ्यांना मागच्या दिवळीपासून पगार मिळालेला नाही. पाणंद रस्त्याची साडेपाचशे प्रकरणे प्रलंबित आहे. जवळपास दोन हजार लोकांची रेशनकार्ड मागच्या दोन वर्षांपासून ऑनलाईन होत नसल्याने त्यांना शासनाचा लाभ मिळत नाही. या विषयी तालुक्याचे आमदार, जिल्हाधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप शिरसाठ यांनी यावेळी केला. गंगापूरला कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करावी अन्यथा दहा दिवसानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालयातील दालनात विष प्राशन करून आत्महत्या करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या