‘महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या’, उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका’

‘महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या’, उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका’

sanjay raut

मुंबई: महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केले आहे.

कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन जितके महाराष्ट्राने केले, तितके ते अन्य राज्यांनी केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राने कोणत्याही बाबतीत घिसाडघाई न करता अत्यंत सावधपणे लॉक डाऊनचे टाळे उघडले आहे. दिवाळीपूर्वी सरकारने निर्बंध शिथिल केले असून दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने रात्री 12 पर्यंत उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व पार्कसुद्धा उघडली जात आहेत. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत. देवळेही बंधमुक्त आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले. असे म्हणत त्यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.

अनेकांचे लहान-मोठे व्यवसाय बंद पडले ही चिंतेचीच बाब आहे. मनोरंजनाचा मोठा व्यवसाय कोसळला आहे. मुंबईतल्या चित्रपट उद्योगावर लाखो लोक अवलंबून आहेत. चित्रपटाची मायानगरी हे मुंबईचे वैभव आहे. ते वैभवच मधल्या काळात झाकोळून गेले. पडद्यामागच्या अनेक कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या चुली विझल्या. सिनेमागृहे, नाटय़गृहे ओस पडली. त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी बेकार झाले. मराठी नाटय़सृष्टीलाही धक्काच बसला. आता या सगळ्यातून उभे राहायचे असले तरी ते सोपे नाही. लोकांना सिनेमा आणि नाटय़गृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे, हे मोठेच आव्हान आहे. मराठी नाटक हे आपल्या संस्कृतीचे गौरवस्थान आहे. मराठी रंगभूमीचे एक म्युझियम सरकार मुंबईत उभे करीत आहे. मराठी भाषा भवनही उभारणार आहेत. ते चांगलेच आहे. पण मराठी सिनेमा, मराठी नाटक हा जो मराठी संस्कृतीचा कणा आहे तोच मोडून पडला आहे. त्यांना विशेष आधाराची गरज असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या