मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक हातभार लावा,आढळराव पाटलांचे एमआयडीसीतील कंपन्यांना आवाहन

पुणे : कोरोना या गंभीर रोगाचे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक संक्रमण झाले असून पुण्यातील संक्रमित रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी चाकण व रांजणगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांसह इतर कंपन्यांनी कंपनी सीएसआरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी साठी जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करावे असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आवाहन केले आहे.

आढळराव पाटील म्हणाले,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य प्रशासन, वैद्यकीय व आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा आदी सर्व यंत्रणा अहोरात्र मेहनत घेऊन काम करीत आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या समवेत देशभरातील महत्त्वाच्या व्यक्ती, प्रथितयश उद्योजक हातभार लावीत आहेत. टाटा, महिंद्रा, वेदांता अशा बड्या उद्योजकांनीही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे रांजणगाव व चाकण औद्योगिक क्षेत्रातिल कंपन्यांनी या जैविक युद्धाचा सामना करण्यासाठी आपल्या सीएसआरचा पुरेपुर उपयोग करण्याचे आवाहन या कंपन्यांना लेखी पत्राद्वारे आपण केले आहे. मुख्यमंत्री निधीला आर्थिक योगदान करण्याबरोबरच व्हेंटिलेटर, वैद्यकीय उपकरणे, ग्लोव्हज आदी साहित्याचा मुबलक पुरवठा कंपन्यांनी मदत स्वरूपात करावा.

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले,’या भागातील स्थलांतरीत नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्याबरोबरच येथील कामगारांना जेवण व निवाऱ्याची व्यवस्था करणे अतिशय गरजेचे आहे’. या सर्व महत्त्वाच्या गरजा भागविण्यासाठी व आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा व्हावा यासाठी चाकण व रांजणगाव एमआयडीसीतील कंपन्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे यासाठी मी या भागातील सर्व कंपन्यांना लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे.