fbpx

महत्वाची बातमी : कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

Onion Farming in India maharashtra

टीम महाराष्ट्र देशा : कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत कांदा विक्री केलेल्या बाजार समितीमध्ये अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे पणन संचालक दिपक तावरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना सहाय्यासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये स्वंतत्र कक्ष सुरू करावेत, शेतकऱ्यांना मोफत अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशा सुचनाही तावरे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, दरात झालेल्या घसरणीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने २०० रुपये प्रति क्विंटल अनुदानाची घोषणा केली. त्यानंतर आता राज्यभरातील विविध बाजार समित्यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. ७५ लाख टन की क्विंटल यामधील संभ्रमावस्था दूर करण्यात आली असून, ७५ लाख क्विंटलला अनुदान दिले जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कांदा अनुदान योजनेच्या अटी व शर्ती

कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान

प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्याला मिळणार अनुदान

डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होणार

१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत सर्व बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या कांदा अनुदानास पात्र

शेतकऱ्यांनी कांदा विक्री पट्टी, ७/१२ उतारा, बॅंकेचे बचत खाते, आधार क्रमांक या कागदपत्रासह विक्री झालेल्या बाजार समितीकडे अर्ज सादर करावा.

७/१२ ज्यांच्या नावे आहे त्यांच्या बॅंक खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे, विक्री पट्टी नावे असलेल्या व्यक्तीने अनुदानासाठी शपथपत्र सादर करावे.