भिडे गुरूजींवरील गुन्हा मागे घेण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन

सातारा  : भीमा कोरेगाव येथील प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे गुरूजी यांच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा धारकरी यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथील घडलेली दुर्दैवी दंगलीमध्ये गुरूवर्य संभाजीराव भिडे गुरूजींचा याच्याशी काही संबंध नाही. सदर प्रकरण घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, कोणतेही आव्हान केले नाही किंवा कोणतेही वक्तव्य केले नाही, असे असताना खोडसाळपणे त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल केले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य महाराष्ट्रात दिवसेंदिवस जोमाने वाढत आहे. हे असंतुष्ट देशविघातक जातीयवादी शक्तींना बघवत नसल्याने त्यांनी आपल्या राजकीय हेतूने प्रेरित होवून जाणिवपूर्वक पूर्ण नियोजितपणे गुरूजींचे नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रकार पुन्हा एकदा केलेला आहे.भीमा कोरेगाव येथील घटना घडली तेव्हा भिडे गुरूजी, माजी मंत्री, आमदार जयवंतराव पाटील यांच्या मातोश्री नुकत्याच निवर्तल्या असल्याने ईश्‍वरपूर जि.सांगली येथे सांत्वनासाठी गेले होते. यानंतर गुरूजींची भोर येथे धारक-यांसमोर सभा झाली.याचे भक्कम पुरावा आहे.

भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून ख-या सुत्रधाराचा छडा लावावा. प्रकाश आंबेडकर कोणत्या आधारावर गुरूजींचे नाव घेवून त्यांना बदनाम करीत आहेत याची चौकशी व्हावी. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा धारकरी शुभम शिंदे व इतर मावळे उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...