नवघरेंची माफी, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे काय? हिंगोलीकरांचा सवाल

Jayprakash Mundada

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून पुष्पहार घालीत असल्याचा राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या नंतर शिवप्रेमींकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. सदर प्रकार आनंदाच्या भरात अनावधानाने घडल्याची कबुली देत आमदार नवघरे यांनी जाहीर माफी मागितली. पण याच व्हायरल व्हिडीओ मध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हे देखील घोड्यावर चढून महाराजांच्या पाठीमागून हात हालवित आहेत. त्यांनीही महाराजांचा अवमान केला असा सवाल उपस्थित करीत आमदारांनी तर माफी मागितली, माजी मंत्री कधी माफी मागणार या मथळ्याखाली आता माजी मंत्री मुंदडा यांचा फोटो व्हायरल होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातुचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. बुधवारी शिवरायांचा पंचधातूने बनविलेला १४ फूट उंच पुतळा जयपूर वरून वसमत येथे दाखल झाला आहे. वसमत येथे पुतळ्याचे जंगी स्वागत शिवप्रेमींच्या वतीने केले गेले. पण येथे अतिउत्साहामध्ये काही जण चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून महाराजांना हार घालीत होते. यामध्ये वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे महाराजांच्या घोड्यावरून चढून हार घालीत असल्याचे दिसले, सदर व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. शिवप्रेमी, संभाजी ब्रिग्रेड आणि भाजपच्या नेत्यांनी ही नवघरेच्या या कृतीबद्दल सडकून टीका केली.

घडलेली चूक लक्षात येताच आपण शिवरायांना मानणारा कार्यकर्ता आहे. आपण शिवरायांचा अवमान करूच शकत नाही असे सांगत आमदार नवघरे यांनी अश्रू ढाळीत जाहीर माफी मागितली. पण याच व्हिडीओत महाराजांच्या पाठीमाघून घोड्यावर शिवरायांच्या टोपाला धरून उभे असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा हे ही दिसत आहेत. राजू नवघरे यांनी घडलेल्या चुकीबद्दल माफी मागितली असली तरी माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी मात्र २४ घंटे उलटून ही माफी मागितली नसल्याने मुंदडा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदारांनी तर माफी मागितली माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा कधी माफी मागणार असा सवाल यातून उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या