मुख्य मुद्दे सोडून भाजप काश्मीरचे राजकारण करतंय : नवाब मलिक

blank

टीम महाराष्ट्र देशा :- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील मुलभूत प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी १२५-१२५ जागा लढवणार आहे, इतर मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. आणखी अनेक समविचारी पक्ष आमच्यासोबत यायला तयार असून चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मलिक म्हणाले.

तसेच देशात सध्या काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण केले जातेय. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा तिरंगा फडकला असे वक्तव्य केंद्रिय गृहमंत्री अमित शाह करतात. मात्र, काश्मीरमध्ये पहिल्यापासून भारताचा झेंडा फडकत असून अमित शाह देशाला चुकीची माहिती देत असल्याचा आरोप नवाब मलिक केला यावेळी केला. आतापर्यंत आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर भारताचा तिरंगा फडकला नव्हता तो आमच्या आंदोलनाने फडकला, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली.

३७० कलमाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय होणे आवश्यक होते. ३७० कलम रद्द करण्यामागे काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग सारखी पर्यटनस्थळे अदानी-अंबानी यांना देण्याचे कटकारस्थान सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली. मूळ प्रश्नांना बगल देत भाजप सरकार काश्मीरच्या झेंड्यावर राजकारण करतेय. काश्मीरच्या झेंड्याला विरोध करणारे हे सरकार नागालँडमध्ये वेगळ्या झेंड्यास विरोध का करत नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

केंद्र आणि राज्यात एक तरी प्रकल्प दाखवा जो भाजपा सरकारने पूर्ण केला आहे. सध्या जी मेट्रोची कामे सुरू आहेत, ती देखील आघाडी सरकारच्या काळातील आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार फक्त श्रेय घेण्यासाठी काम करत असल्याची टीका मलिक यांनी केली. या पत्रकार परिषदेला माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले खासदार वंदना चव्हाण प्रवक्ते महेश तपासे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या