fbpx

मूर्खांच्या स्वर्गात राहू नका, आपल्याला कोणीही पाठींबा देणार नाही : पाकिस्तान

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांचे नेते काहीही बरळताना दिसत आहेत.

पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर टीका केली होती. परंतु पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रातही आपल्याला पाठिंबा मिळणं सोपं नाही, मूर्खांच्या स्वर्गात राहू नका, असं विधान केले आहे. तसेच पाकिस्तानी आणि काश्मिरींना हे माहित पाहिजे की कुणीही आपल्यामागे उभा नाही, सगळं काही आपल्यालाच करावं लागणार आहे, असं मोहम्मद कुरैशी म्हणाले.

पुढे बोलताना कुरेशी यांनी भावनिक होणं सोपं आहे, मलाही फक्त दोन मिनिट लागतील. गेल्या ३५ वर्षांपासून राजकारण करतोय. पण हा मुद्दा पुढच्या पातळीवर नेणं कठीण आहे अस मत व्यक्त केले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत हा प्रश्न मांडल्यास रशिया आपल्याला नकार देणार असल्याचंही कुरेशी म्हणाले.

दरम्यान, काश्मीर प्रश्नावरून इमरान खान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्ध करण्याची भाषा केली होती. मंत्री फवाद चौधरी यांनी, ‘संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे’ असं विधान केले होते.