पंतप्रधानपदासाठी मोदींपेक्षा नितीन गडकरी उत्तम पर्याय : अनुराग कश्यप

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे, मात्र काही नेत्यांकडून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना देखील पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शवण्यात येत आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विटकरत नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा उत्तम पंतप्रधान होवू शकतात, असे म्हंटले आहे. तसेच भारतीय राजकारणातून भ्रष्ट्राचाराला दूर करणे अशक्य असून सर्व राजकारणी सारखेच असतात, अशी भावना कश्यप यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक कलाकारांकडून विरोध करण्यात येत आहे, जवळपास ६०० कलाकारांनी पत्रक काढत मोदींना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे, तर मोदी यांच्या बाजूने उभे राहत ९०७ कलाकारांनी भाजपला मतदान करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पाच राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, त्यावेळी देशभरातून अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोदींच्या ऐवजी नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदासाठी पसंती देण्यात आली होती, तसेच ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे है गडकरी’ अशी घोषणा देण्यात येत होती.