#corona : शहराच्या प्रवेशद्वारावरचं होतंय वाहनांचे निर्जंतुकीकरण

बारामती : ‘कोरोना’ने मोठ्या प्रमाणात हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे बारामती शहरात कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यावर शहरात युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने त्याचा शहरात फैलाव होऊ नये, म्हणून बारामती नगर परिषदेने स्वच्छतेच्या बाबतीत तसेच शहर निर्जंतुकीकरणास सुरुवात केली आहे.

शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांवर बारामती नगरपरिषदेकडून शहरात येणाऱ्या सर्व टोल नाक्यावर आरोग्य विभागाचे कामगार हात पंपाच्या साहाय्याने चारचाकी व दुचाकीवर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करत आहेत.

बारामती पालिकेच्या आरोग्य विभागाचे कामगार नऊ हात पंपातून तीन शिफ्ट मध्ये २७ कामगार टोल नाक्यावर निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधाची फवारणी करत आहेत.

दरम्यान, बारामती नगर परिषदेचे नगरसेवक अतुल बालगुडे यांनी जळोचीमध्ये तर नगरसेवक समीर चव्हाण यांनी तांदुळवाडी मध्ये स्वतःच्या ट्रॅक्टर वर सर्व यंत्रणा लावून स्वखर्चाने सगळ्या गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे.