भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटन अधिक मजबूत होणार

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन अधिक व्यापक करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सुरूवात श्री.हजारे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून,दि.१५ जून पासून करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक येथील विश्राम गृहात पार पडली या वेळी संघटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, दत्ता आवारी, शरद पवळे, दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते रामदास घावटे, बबनराव कवाद, संदीप पठारे, भूमीपुत्रचे अध्यक्ष संतोष वाडेकर, दत्तात्रय भुकन, मच्छिंद्र उचाळे, तुषार औटी, तुकाराम तनपुरे, विजय साळवे, रामदास कवडे, नंदकुमार कोल्हे, भाऊसाहेब खेडेकर, प्रवीण औटी, देवराम खोडदे, सचिन नगरे, धीरज महांडुळे, भगवान गायकवाड, मनोज तामखडे, निलेश निंबाळकर आदी उपस्थित होते.

दिल्ली येथील आंदोलना नंतर श्री.हजारे यांनी जन आंदोलनाचे संघटन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेतील कार्यकर्ते चारीत्र्यशील असावेत त्यांना संघटनेच्या ध्येय धोरणाची, काम करण्याच्या पध्दतीची सखोल ओळख असावी असा श्री.हजारे यांचा आग्रह आहे. त्यासाठी आंदोलना दरम्यान प्रतीज्ञा पत्रे सादर केलेल्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा राळेगण सिध्दी येथे आयोजीत करण्यात येत आहेत. आत्ता पर्यंत दोन दिवसीय दोन निवासी कार्यशाळा पार पडल्या आहेत.

या कार्यशाळे मधून आखून दिलेल्या आराखड्या प्रमाणे संघटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामधे प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणांमधे आंदोलना विषयी जागृती करणे, गावा गावांमधे बैठका घेऊन व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या चळवळीत सहभागी होण्याचे अवाहन करणे, तालुक्यातील प्रत्येक घरात या चळवळी विषयीचे श्री.हजारे यांच्या स्वाक्षरीचे माहिती पत्रक पोहचवणे, आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र तयार करुन घेणे या व इतर उपक्रमांचा समावेश आहे. आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर प्रतिज्ञा पत्र तयार करुन राळेगण सिध्दी येथील कार्यालयाकडे पाठवावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची सुरूवात पारनेर तालुक्यातून झाली आहे. श्री.हजारे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून देशातील जनतेला माहितीचा अधिकार, ग्रामसभांना अधिकार या सारखे हक्क प्राप्त करुन दिले. जनतेच्या हिताचे लोकपाल सारखे अनेक कायदे या आंदोलनाच्या माध्यमातून झाले.त्यामुळे पारनेर तालुक्यातील आंदोलनाचे संघटन जास्तीत जास्त व्यापक व मजबूत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.