नागरिकांच्या प्रश्नांची उत्तर देताना ‘या’ भाजप नेत्याची झाली फजिती

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक सिनेकलाकारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सिनेकलाकार मोठ्या उत्साहात प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, मात्र राजकारणात नवखे आणि परिपूर्ण नसल्याने या कलाकारांची जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना फजिती होतना दिसत आहे. अशीच फजित ज्येष्ठ कलाकार अनुपम खेर यांची झाली आहे. ते आपली पत्नी आणि भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारार्थ चंदीगड मध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांची सामान्य नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली.

झाले असे की, चंदीगडमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांसह अनुपम खेर एका दुकानात पोहोचले. पण दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे अनुपम खेर काहीसे गोंधळले. दुकानदाराच्या हातात भाजपचा मागील लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा होता. जाहीरनामा दाखवत त्याने विचारलं की, “मागील निवडणुकीत तुम्ही काही आश्वासनं दिली होती, यापैकी तुम्ही काय केलं आहे?” मात्र यावेळी अनुपम खेर यांना कोणतंही उत्तर देता आलं नाही आणि ते तिथून हात जोडून निघून गेले.

अनुपम खेर यांची अशी फजिती झाल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर सध्या मोठ्या जोशामध्ये त्यांचा प्रचार करत आहेत.

या घटनेनंतर अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे लिहिले की, “काल किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी दोन जणांना एका दुकानात ठेवलं होतं, मला भाजपच्या 2014 मधील जाहीरनाम्यावर प्रश्न विचारण्यासाठी. मागे उभा असलेला माणूस व्हिडीओ बनवत असल्याचं पाहून मी तिथून निघालो. आज त्यांनी व्हिडीओ जारी केला. दाढीवाल्याचं कृत्य पाहा.”