शिवसेनेचा किरीट सोमय्या यांना आणखी एक धक्का

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत गाजलेल्या किरीट सोमय्या उमेदवारी प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. जर युती कडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी किरीट सोमय्या यांच्या नावाची घोषणा झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेने एकत्र येत युती केली आहे. मात्र ही युती फक्त वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली असून कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्ये अजून मनोमिलन झाले नसल्याच दिसत आहे. असाच काहीसा प्रकार ईशान्य मुंबईच्या जागेसाठी झाल्याच दिसत आहे. भाजपच्या किरीट सोमय्या यांना जर युतीकडून तिकीट दिल्यास शिवसेना किरीट सोमय्या यांना पाठींबा देणार नसल्याच तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिला तर शिवसेनेचा द्या किंवा भाजपचा अन्य कोणता ही उमेदवार द्या आम्ही त्याला पाठींबा देऊ अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर आता शिवसेनेच्या एका आमदाराने किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरुद्ध अपक्ष उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे. आमदार सुनील राऊत यांनी हा बंड पुकारला आहे.

दरम्यान या संदर्भात सुनील राऊत म्हणाले की, गेल्या चार वर्षात सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत शिवसैनिकांचा छळ केला आहे. त्यामुळे आमचा विरोध भाजपला नाही तर सोमय्या यांना आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण जर ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल. भाजपने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या बाजूने असू असेही राऊत म्हणाले. तसेच सोमय्या यांना उमेदवारी मिळालीच तर गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर अपक्ष म्हणून उमेदारीचा अर्ज दाखल करु, असे राऊतांनी सांगितले.