दुखापतीमुळे आणखी एक खेळाडू संघाबाहेर; रहाणेची वाढली चिंता

team india

सिडनी : भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून रोज यात नवीन भर पडत आहे. एका पाठोपाठ टीम इंडियाला धक्का बसत आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातच आता अजून एक फलंदाज ब्रिस्बेन कसोटी सामन्याला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिडनी कसोटी सामन्यात हनुमा विहारी मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही, तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येदेखील विहारी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता सराव सुरू असताना मयंक अगरवाल यालाही दुखापत झाली आहे.

स्पोर्ट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मयंकला हनुमा विहारी च्याऐवजी टीममध्ये खेळवण्यात येणार होतं, पण आता सराव करत असताना त्यालाही दुखापत झाली आहे. मयंकच्या दुखापतीचं स्कॅनिंग करण्यात आलं आहे, याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्याला फ्रॅक्चर होऊ नये, या आशेवर टीम प्रशासन आहे. पण या दुखापतीमुळे ब्रिस्बेन टेस्टमध्ये कोण खेळणार, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मयंकच्या दुखापतीमुळे भारताचं ब्रिस्बेन टेस्टमधलं संकट आणखी वाढलं आहे. टीममधले सगळे वरिष्ठ बॉलर दुखापतग्रस्त आहेत. तर आता बॅट्समननाही दुखापती होऊ लागल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मोहम्मद शमी, उमेश यादव, रविंद्र जडेजा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी आधीच बाहेर झाले आहेत. तर ऋषभ पंत, मयंक अगरवाल आणि आर.अश्विन या तिघांना दुखापत झाली असली, तरी ते अजूनही सीरिजमध्ये आहेत.

सिडनी टेस्टमध्ये पॅट कमिन्सने टाकलेला बॉल ऋषभ पंतच्या कोपराला लागला होता. तर अश्विनचीही कंबर दुखत होती. रोहित शर्मा दुखापतीतून बरा झाल्यानंतर सिडनी टेस्टमधून टीममध्ये आला. आता मयंकलाही दुखापत झाल्यामुळे शेवटच्या टेस्टमध्ये कोणाला खेळवायचं हा प्रश्न अजिंक्य रहाणेपुढे आहे.

महत्वाच्या बातम्या