fbpx

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आणखी एका नवीन पक्षाची भर

औरंगाबाद :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष यांची नुकतीच दोन दिवसांची राज्यस्तरीय मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या तीस जागा लढविण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने घेतला असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील कलश मंगल कार्यालयात पार पडलेल्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर स्वतंत्र भारत पक्षाचे तीस उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत. शेतकऱ्यांशी निगडित सर्व कर्जे संपविण्यात यावीत व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा; तसेच 23 हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिलही माफ करावे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य बहाल करावे, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचा बळी गेल्यास आर्थिक मदत मिळते तीच सर्पदंशालाही मिळावी.

तसेच वनहक्क कायद्यातील वनजमिनीच्या मालकीपट्ट्यातील जाचक अटी रद्द कराव्यात आदी ठराव बैठकीत घेण्यात आले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सचिव गुणवंत पाटील हंगरगेकर, उपस्थिती होती.