शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात

टीम महाराष्ट्र देशा : श्री समर्थ वाग्देवता मंदिर हे महाराष्ट्राच्या धुळे शहरातील साहित्यसंस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्राचे वाचन रविवारी पुण्यात झाले. २ फेब्रुवारी १६७४ रोजीचे हे पत्र नुकतेच समोर आले आहे. मोडी कागदपत्रांची पाहणी करताना इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांना समर्थ वाग्देवता मंदिरात पत्र मिळाले. पत्रात वरच्या ‘श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबक सुत मोरेश्वर’ अशी प्रधानाची मुद्रा असून पत्राच्या शेवटी ‘मर्यादेयं विराजते’ अशी महाराजांची समाप्ती मुद्रा आहे.

‘शिवछत्रपतींची पत्रे’ या विषयाच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी रविवारी या पत्राची माहिती दिली. कुलकर्णी यांनी सांगितले की, हे पत्र म्हणजे सातारा जिल्ह्य़ातील श्री खंडोबाची पाल या गावातील कालभार नावाच्या पाटील यांना पाटीलकीच्या वतनाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून दिलेला कौलनामा म्हणजे अभयपत्र आहे. पत्रावर ५ जिलकाद आर्बा सबैन अलफ म्हणजेच २ फेब्रुवारी १६७४ ही तारीख आहे. रायगडावरून पाली येथे पाठवलेले हे पत्र राज्याभिषेकाच्या पाच महिने आधीचे आहे.

पत्राच्या माथ्यावर शिवाजी महाराजांची ‘प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते’ ही मुद्रा आहे. ही मुद्रा शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजे १६४६ मध्ये आपल्या एका पत्रावर उमटवली होती आणि तीच राज्याभिषेकानंतरही कायम ठेवली. या पत्राच्या शाईचा दर्जा अजूनही व्यवस्थित टिकून आहे. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे मूळ पत्र संग्रही आहे.

छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये- अजित पवार