मोदींचा आणखी एक खोटारडेपणा; नौदलाच्या माजी अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींवर केलेले आरोप चुकीचे आहेत. एवढेच नव्हे तर, त्यामुळे नौदलाची बदनामी होत आहे, अशी प्रतिक्रिया देत निवृत्त अॅडमिरल आय. सी. राव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी आणि परिवाराने आयएनएस विराट या युद्ध नौकेचा मनोरंजनासाठी टॅक्सीसारखा वापर केला, या आरोपांवर राव यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

संरक्षण आणि नौदलाच्या प्रोटोकॉलनुसार, कुठल्याही पंतप्रधानांच्या औपचारिक दौऱ्यावर युद्ध नौका किंवा हेलिकॉप्टर वापर करण्यात काही गैर नाही असं त्यांनी म्हटलं आहे. लक्षद्वीप दौऱ्यावर राजीव गांधी असताना कुठलीही पार्टी झाली नव्हती, कोणीही परदेशी पाहुणे नव्हते. राजकारणासाठी संरक्षण खात्याच्या नावाचा वापर होणे चुकीचे आणि निंदनीय आहे. पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने याची काळजी घेतली पाहिजे, असेही राव म्हणाले.

दरम्यान,लोकसभेच्या निवडणुकांचे दोन टप्पे राहिले असताना कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. दिवंगत पंतप्रधन राजीव गांधी यांना भाजपकडून लक्ष्य केले जात असल्याने कॉंग्रेस चांगलीच घायाळ झाली आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासुरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.