मंत्रालय कि आत्महत्यालय? आणखी एका वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

शुक्रवारी सकाळी पत्र लिहून दिला होता आत्महत्येचा इशारा

मुंबई : मंत्रालयात आत्महत्येच सत्र सुरूच आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी सरकारच्या विरुद्ध लढा देणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज पुन्हा मंत्रालयासमोर आणखी एका वृद्ध महिलेनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सखुबाई विठ्ठल झाल्टे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सखुबाई झाल्टे यांनी पत्र लिहून शुक्रवारी आत्महत्येचा इशारा दिला होता. सखुबाई यांची जमीन एका नातेवाईकाने हडपली असून यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. शेवटी कंटाळून सखुबाई झाल्टे यांनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालय कि आत्महत्यालय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या ४ महिन्यात ६ जणांनी मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये धर्मा पाटील या शेतकऱ्यासह दोघांचा मृत्यू झाला होता.