मुलांची तस्करी प्रकरणात आणखी एक दलाल पोलिसांच्या जाळ्यात

jail

औरंंगाबाद : लहान मुलांची भीक मागण्यासाठी तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका दलालास अटक केली आहे. सय्यद रफीक सय्यद इब्राहीम (वय ५५,रा.चंदनझीरा, जि.जालना) असे अटकेत असलेल्या दालालाचे नाव असून आतापर्यंत पोलिसांनी तीन महिलांसह दोन दलालांना अटक केली आहे. दरम्यान, अटकेत असलेला दलाल सय्यद रफीक सय्यद इब्राहीम याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले.

संजयनगर मुकुंदवाडीत राहणारे समाजसेवक देवराज नाथाजी वीर (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मुलांची तस्करी करून त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जनाबाई जाधव व सविता पगारे यांच्याविरूध्द २ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. चौकशी दरम्यान, पोलिसांनी नंदा उदावंत हिला ४ सप्टेंबर रोजी आणि दलाल सुरेश लाखोले याला ५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. अटकेत असलेला दलाल सुरेश लाखोले हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून सात ते आठ महिन्यापूर्वी तो जालना येथील एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करीत असतांना त्याची ओळख सय्यद रफिक याच्यासोबत झाली होती.

त्यावेळी लाखोले याने मुकुंदवाडीत राहणाऱ्या जनाबाई जाधव व सविता पगारे यांना एका लहान मुलाची आवश्यकता असल्याचे सय्यद रफिक याला सांगितले होते. त्यावेळी सय्यद रफिक याने मुस्लिम पीडित मुलाच्या वडीलासोबत त्याची ओळख करून दिली होती. त्यानंतर सय्यद रफिकच्या मध्यस्थीने पीडित मुस्लिम मुलाला जनाबाई जाधव व सविता पगारे यांच्या ताब्यात दिले असल्याची कबूली सय्यद रफिक याने पोलिसांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :