कॉंग्रेसला आणखी एक धक्का, राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्त्याची पक्षाला सोडचिठ्ठी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले असून प्रचाराच्या तोफा आता थंडावत आहेत. तर दुसरीकडे अजूनही कॉंग्रेस नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी या कॉंग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडे येण्याच्या मार्गावर आहेत.

लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील नाराज मंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी देखील पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसला रामराम ठोकून प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच सांगितलं जात आहे.

दरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतंच काँग्रेसवर टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता. ट्विटरवरुनही चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली होती.

प्रियांका चतुर्वेदी  या लेखक असून त्यांनी अनेक   वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. तर मे २०१३ मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली.  रणदीप सुरजेवालांच्या नेतृत्वातील ‘कम्युनिकेशन विभागा’च्या त्या सदस्या आहेत.