fbpx

देशामध्ये आणखी एका बालाकोटची प्रक्रिया सुरु आहे : मेहबुबा मुफ्ती

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी देशभरात एक्झिट पोल्सने धुमाकूळ घातला आहे. अनेक एक्झिट पोल्सने या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर या एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरणार असून हे खोटे एक्झिट पोल्स आहेत, असा दावा अनेक पक्षांकडून केला जात आहे. असे सारे गोंधळलेले वातावरण असतानाच पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी खळबळ जनक ट्वीट केले आहे.

ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे ठोस पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून अजूनही शंकांचे निरसन करण्यात आलेले नाही. हे सगळे सुरु असतानाच आता एक्झिट पोलची संशयास्पद आकडेवारी समोर आली आहे. परिणामी देशात एकप्रकारची खोटी लाट निर्माण झाली आहे. या सगळ्यावरून आणखी एका बालाकोटची प्रक्रिया सुरु असल्याचे दिसत आहे,असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान सातव्या टप्यातील मतदान संपल्यानंतर देशभरात विविध चॅनल्सने एक्झिट पोल जाहीर केले. एक्झिट पोल नुसार जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) जम्मू काश्मीरच्या सहापैकी एकाही मतदारसंघात विजय मिळणार नाही. तर भाजपला जम्मूतील दोन लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.