संतापजनक! ‘शिवप्रेमी’ नावाने मटका जुगाराच्या चिठ्या

matka jugar

बीड – बीडच्या केजमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. केज शहरात ‘डे चेन्नई’नावाने सुरू असलेल्या मटका जुगाराच्या चिठ्यावर ‘शिवप्रेमी’ नावाचा वापर केला जात असल्याचे उघड झालेय. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून हा शिवप्रेमी नावाने सुरू असलेला मटका जुगार तत्काळ बंद करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या मटक्याच्या आहारी गेलेले नागरिक कमाई करून आणलेले पैसे मटक्यावर घालवीत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होत आहे. पोलिसांकडून बोटावर मोजण्या इतक्या लहान बुक्यावर कारवाई केली जात आहे. तर कारवाई करून ही मटका बुक्या दुसऱ्या दिवशी सुरू राहत आहेत. त्यामुळे केजमध्ये अनेक मटका जुगार चालकांचे बस्तान बसले आहे. मटका जुगाराचे अनेक प्रकार असून त्यापैकी ‘डे चेन्नई’ नावाच्या मटका जुगाराच्या चिठ्यावर आता चक्क ‘शिवप्रेमी’ नावाचा वापर केला जात आहे. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावत असल्याचा मुद्दा उपस्थित करून संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमक झाली आहे.

‘डे चेन्नई शिवप्रेमी’नावाने सुरू असलेला मटका येत्या चार दिवसात कारवाई करून बंद करण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने हा जुगार बंद करू असा इशारा तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, जुगारामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होत आहेत. केज आणि युसुफवडगाव पोलिसांनी या जुगार अड्ड्यांवर कारवाया करून हा जुगार तालुक्यातून हद्दपार करावा अशी मागणी ही जनतेतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या