ऐन निवडणुकीच्या तोंडावर शौचालये बांधण्याची घोषणा

Aurangabad

औरंगाबाद : शहराचा वेगाने विस्तार होत आहे. मात्र शहरात स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. अनेक नागरिक उड्डाणपूल, रस्त्याचा आडोसा घेतात. पण महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. उशिरा का होईना ही बाब मनपाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे शहरात शंभर ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यातील ५० स्वच्छतागृह महिलांसाठी तर ५० पुरुषांसाठी असतील. मात्र ही फक्त निवडणुकीसाठीची घोषणा ठरू नये एवढीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विषय गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी, सराफा, शहागंज, निराला बाजार येथे सार्वजनिक स्वच्छतागृह असले तरी पडझड व देखभाल दुरुस्ती अभावी ते बंद आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी याविषयी वारंवार आवाज उठवला. त्यामुळे पांडेय यांनी शहरात शंभर ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फायबरपासून तयार केलेले हे स्वच्छतागृह असतील. त्यामुळे जागाही कमी लागणार असून किंमतही कमी असेल.

महत्वाच्या बातम्या