राज्यसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर; राणेंच्या नशिबी प्रतीक्षा

टीम महाराष्ट्र देशा- 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली असून राज्यसभेसाठी भाजपचे 8 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत . महाराष्ट्रातील उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश केलेला दिसून येत नाही. नारायण राणे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु होती मात्र राणेंना पहिल्या यादीत स्थान मिळू शकले नाही. त्यांना अजून थोडी प्रतीक्षाच करावी लागणार अशी चिन्हे आहेत.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना महाराष्ट्रातून उमेदवारीची चर्चा होती. पण त्यांना मध्यप्रदेश मधून उमेदवारी देण्यात आली आहे.एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

भाजपचे राज्यसभा उमेदवार: उत्तर प्रदेशमधून अरुण जेटली, मध्यप्रदेशमधून थावर गेहलोत, गुजरातमधून मनसुख मंडविया आणि पुरुषोत्तम रुपाला, हिमाचल प्रदेशमधून जेपी नड्डा, बिहारमधून रविशंकर प्रसाद आणि राजस्थानमधून भूपेंद्र यादव.


दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन समाजवादी पक्षाकडूनच राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांना छेद देत जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातून सपातर्फे उमेदवारी अर्ज केला.केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार:वंदना हेमंत चव्हाण – राष्ट्रवादी, डी. पी. त्रिपाठी – राष्ट्रवादी, रजनी पाटील – काँग्रेस, अनिल देसाई – शिवसेना, राजीव शुक्ला – काँग्रेस, अजयकुमार संचेती – भाजप

कोणत्या पक्षाचे किती खासदार?:भाजप -17, काँग्रेस – 12, समाजवादी पक्ष – 6, जदयू – 3, तृणमूल कॉंग्रेस – 3, तेलुगू देसम पक्ष – 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस – 2, बीजद – 2, बसप – 1, शिवसेना – 1, माकप – 1, अपक्ष – 1, राष्ट्रपती नियुक्त – 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.