मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Announcement of election program for president of Marathi Sahitya Sammelan

नागपूर : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीचा कार्यक्रम आज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भा. जोशी यांनी जाहीर केला. निवडणुकीची प्रक्रिया ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर, अध्यक्षाची घोषणा १० डिसेंबर रोजी केली जाईल. यासंदर्भात, विदर्भ साहित्य संघात झालेल्या अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजतापर्यंत महामंडळाच्या मतदार याद्या उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर, संध्याकाळी ७ वाजतापर्यंत त्या याद्या निर्वाचन अधिका-याकडे सोपवण्यात येतील. तर, अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी १४ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजतापर्यंत आपले अर्ज घटक संस्था, समाविष्ट संस्था व संलग्न संस्थांकरवी महामंडळाकडे सादर करायचे आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजतानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील.

अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवरांना २३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, २३ ऑक्टोबर रोजीच संध्याकाळी ७ वाजतानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदारांकडे मतपत्रिका रवाना करण्यात येतील. त्या मतपत्रिका ९ डिसेंबरपर्यंत निर्वाचन अधिकाऱ्यांना पाठवण्यात येतील. तर १० डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद भा. जोशी यांनी दिली.