नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन कालावधीतच मदत जाहीर करु- कृषीमंत्री

नागपूर : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ७ लाख १४ हजार ४२५ हेक्टरवर धानाची लागवड झाली आहे. काही ठिकाणी त्यावर खोड किडा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे, करपा, कडा करपा या कीडीचा तथा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आत मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत दिली.

आमदार सर्वश्री राजेश काशीवार, विजय रहांगडाले, कृष्णा गजबे, गोपालदास अग्रवाल आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, धान पीकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहेत. हे पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना विम्यामार्फत तसेच केंद्र शासनाच्या एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. पूर्व विदर्भातील भात पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची संकलित उत्पादकता आकडेवारी विमा कंपन्यांना देऊन या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.

तसेच किड व रोग या बाबींचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक आपत्ती तथा वैयक्तिक पंचनाम्यासाठी पात्र आपत्ती या प्रकारात करण्याबाबत केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

You might also like
Comments
Loading...