‘सुशांतच्या मृत्यूला वर्ष पूर्ण ; सीबीआयच्या तपासातून काय निष्पन्न झालं?’ ; मलिकांचा सवाल

nawab malik

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या वर्षी 14 जूनला आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता. सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या अशा अचानक निघून जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, ज्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. चाहते सतत सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी सातत्याने करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रकरणात ज्याप्रकारे राजकारण झाले ते सर्वांसमोर आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना राजकीय कारणांमुळे या प्रकरणात बिहार सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला गेला. मात्र सीबीआयच्या तपासातून निष्पन्न काय झालं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

तसेच एका वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. जर त्याची आत्महत्या नव्हती, तर त्याचा मारेकरी कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी देखील मलिक यांनी केली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्येशिवाय आणखी काही आहे का? याची आजपर्यंत सीबीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.

एकंदर सुशांतसिंग राजपूतच्या नावाने भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती, म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान आज सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने त्याचे चाहते आणि मित्रपरिवार सुशांतचे स्मरण करत आहेत. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. भूमी पेडणेकर, संजना संघी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा या दिवशी सुशांतची आठवणी शेअर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP