लोकपाल कायदा असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे आलं असतं : हजारे

अण्णा हजारे, नरेंद्र मोदी

अहमदनगर : ‘लोकपाल कायदा असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे आलं असतं,’ असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राफेल प्रकरणात उडी घेतली आहे. सरकारच्या ‘हम करे सो कायदा’, या भूमिकेमुळे ‘राफेल’ची चौकशी होत नाही, असंही अण्णा हजारे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले अण्णा हजारे ?
‘लोकपाल असता तर देशात सीबीआय अंतर्गत आरोप-प्रत्यारोप, राफेलबाबतचं सत्य नक्कीच पुढे आलं असतं. मात्र सरकारला लोकपाल नको आहे. सरकारची याबाबतची भूमिका हम करे सो कायदा, अशी असल्याने सत्य बाहेर येऊ दिले जात नाही.राफेलमध्ये भ्रष्टाचार झालाच नाही, असं म्हणता येणार नाही आणि झाला म्हणावं तर सामान्य जनतेपुढे तसे पुरावे आलेले नाहीत. त्यामुळेच अशा संदिग्ध प्रकरणात लोकपाल असता आणि सामान्य जनतेने मागणी केली असती तरी चौकशी होऊन जनतेसमोर सत्य आलं असतं’