अण्णा हजारे पुन्हा आंदोलन छेडण्याच्या तयारीत

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘इव्हीएम’ वरून उमेदवाराच्या नावासमोरील पक्षाचे चिन्ह हटविण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘आपल्या राज्य घटनेत पक्ष आणि पार्ट्यांचा कोठेही उल्लेख नाही; मात्र, पूर्वीच्या काळात शिक्षणाचे प्रमाण कमी होते, तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. त्यामुळे अशिक्षित मतदारांना लक्षात यावे यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या पक्षाचे चिन्ह छापण्यात येऊ लागले. त्यातून पक्षीय पद्धत रुढ होत गेली. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले असून खरी लोकशाही देशात प्रस्थापित होऊ शकलेली नाही. त्यामुळे मतपत्रिकेवर चिन्ह नसावे, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

राळेगणसिद्धी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले,आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यामुळे उमेदवाराचा फोटो लावता येतो. शिवाय शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने लोकांना उमेदवाराचे नावही वाचता येते. म्हणून आता जुनी बेकायदा पद्धत बदलावी, अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आयोगाने याची थोडी दखल घेऊन उमेदवाराच्या नावासोबत फोटो देण्याची पद्धत सुरू केली; मात्र, चिन्हही छापले जात आहे. ते चिन्ह छापणे बंद करावे, यासाठी आम्ही आता आंदोलन हाती घेत आहोत. यासाठी देशभर जनजागृती करण्यात येऊन याविरोधात दबाव वाढविण्यात येणार आहे.’