मी दोनवेळा उपोषणाला बसलो.. दोन्ही वेळेस तेथील सरकार पडले – अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या २३ मार्च रोजी लोकपाल, लोकायुक्तसाठी दिल्लीत उपोषण करणार आहेत. दिल्लीमध्ये मी दोनवेळा उपोषणाला बसलो.. दोन्ही वेळेस तेथील सरकार पडले. यावेळी हेच होणार आहे. काँग्रेसने लोकपाल कायदा करून फसवणूक केली आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक प्रामाणिक व्यक्ती होते. पण त्यांनी कायदा न करता देशाला धोका दिला. अस अण्णा हजारे म्हणाले आहेत. अण्णा हजारे मंगळवारी सीतापूर (उत्तर प्रदेश) येथील राजा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.

या उपोषण आंदोलनाला ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बोलावणार नाहीत. केजरीवाल हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशा लोकांनी माझ्याकडे येण्याची गरज नाही. त्यांच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. ही बाबही चांगली नाही. निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
मला अपेक्षा होती की अच्छे दिन येतील. पण त्यांनी भ्रष्टाचार आणखी वाढवून ठेवला आहे. कलम ४४ संमत करून अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. ही पण एक चोरीच आहे. अस म्हणत अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.