फडणवीसांनी केलेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतर देखील अण्णांचा बाणा कायम !

narendra modi and anna hajare

नगर : दिल्ली सीमेजवळ शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाने देखील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना केली असून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला देखील स्थगिती दिली आहे.

शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. तर, आज केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात झालेल्या ११ व्या बैठकीत देखील तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी आपल्या आयुष्यतील शेवटचे आंदोलन पुकारले आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे.

याला अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. दिल्लीत परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अण्णांची समजूत काढण्यासाठी आज राळेगणसिद्धी येथे दाखल झाले होते. अण्णांनी हे आंदोलन करु नये यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी सुरु आहे. मात्र, या नेत्यांच्या समजुतीचा अण्णांवर परिणाम झालेला नसून ते आंदोलनावर ठाम असल्याचं समजत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाच्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना दिली आहे. 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या