कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम; अण्णा हजारे पवारांवर बरसले

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. अनेत्क नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यावरून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

अण्णा हजारे यांनी पक्षांतरावरून शरद पवारांना टोला लगावला आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून अनेक लोक सोडून जात आहेत. याचं कारण म्हणजे शरद पवारांचं काम आहे. साखर कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून ‘जैसी करनी वैसी भरनी’ असल्याचे अण्णा हजारे म्हणाले आहेत. त्यामुळे अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. त्यांनी सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोकं पक्षात घ्यावी लागतात. तशी मंडळी भाजप घेत आहे. जनतेने यांचा निकाल लावावा, असं विधान अण्णा हजारे यांनी केले आहे. पुढे बोलताना त्यांनी भाजपची सुद्धा काही वर्षात अशीच अवस्था होईल. हे लोक यांना सोडून पळून जातील, असेही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ, सचिन आहिर, धनंजय महाडिक, वैभव पिचड, यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच रश्मी बागल आणि दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.