पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात ‘पाटलां’ची पोर, झेडपी पोटनिवडणुकीत अंकिता पाटील विजयी

टीम महाराष्ट्र देशा: पुणे जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गणाच्या पोटनिवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा विजय झाला आहे, हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर बावडा-लाखेवाडीच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झाले होते.

अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालेलं आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील हे दोन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. तर स्वतः हर्षवर्धन पाटील १९९४ पासून राजकरणात सक्रीय आहेत, आजवर त्यांनी अनेक मंत्री पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. आता अंकिता यांच्या रूपाने पाटील घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे.