अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

टीम महाराष्ट्र देशा –   सांगली शहर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियाला राज्य शासनाच्यावतीने दहा लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केली. अनिकेत कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा विचार राज्य शासन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. गत आठवड्यात लूटमारी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनिकेत कोथळे याचा सांगली शहर पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता.

bagdure

हा खून पचविण्यासाठी संबंधित पोलिसांनी त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला होता. कायद्याचे रक्षक असलेलेच भक्षक बनल्याने सांगली जिल्ह्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन रविवारीच दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. सोमवारी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबियाला राज्य शासनाच्यावतीने दहा लाख रूपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. कोथळे कुटुंबियाच्या मागणीनुसार या कुटुंबासह त्याचा साथीदार अमोल भंडारे याच्या कुटुंबियाला पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...